सुमित्रा

 रामायणातील महत्वाची पण कमी माहितीतील पात्र 

सुमित्रा

डॉ. अलोक पवार

हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये रामायण हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये रामाच्या जन्मापासून अगदी उत्तरकांड सर्वच गोष्ट भेटते. यामध्ये राम आणि काही ठराविक पात्रे सोडली तर बाकीची पात्रे अतिशय महत्वाची असूनही बऱ्याच जणांना काही पात्रांच्या विषयी फारच थोडे माहिती आहे. आज आपण यातलेच एक महत्वाचे पात्र पाहणार आहोत, सुमित्रा..

सुमित्रा म्हणजे रामाची सावत्र आई. लक्ष्मणाची आई. आज याच लक्ष्मणाच्या आई विषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

जर एकाच राजाला एकापेक्षा जास्त राण्या असतील तर मोठी राणी असेल तिला मोठा दर्जा दिला जातो. तिला पट्टराणी असे देखील म्हणले जाते. राजा दशरथ याची मोठी आणि पहिली बायको म्हणजे कौशल्या. राणी कैकयी ही दशरथाची आवडीची राणी होती कारण तिने दशरथाचा एका युद्धात जीव वाचवला होता. कैकयी ही राहताना देखील महालात दशरथ यांच्यासोबत रहायची. सुमित्रा ही मात्र तिचा आश्रय तिची सवत कौशल्या हिच्यासोबत रहायची. कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या एकमेकीच्या जरी सवती असल्या तरी त्यांच्यात विशेष प्रेम होते. आज कालच्या सवती जशा भांडतात एकमेकीच्या मनात जसा तिढा असतो असे त्यांचे काहीही नव्हते. राणी सुमित्रा त्यांच्या वागणुकीतून नेहमीच हे दाखवून द्यायच्या की मोठ्या राणी कौशल्या हिची सेवा करणे हेच आपले परमोच्च कर्तव्य आहे. आपल्या आई प्रमाणे सुमित्रा या कौशल्या कडे पहायच्या. 

दशरथ राजाला तीन बायका असून पुत्र प्राप्ती झाली नव्हती. सत्तेला वारसदार हवा. राजगादि सांभाळायला कोणीतरी पाहिजे या हेतूने राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला होता. या यज्ञानंतर यज्ञाचा प्रसाद म्हणून राणी कौशल्या हिला मोठी राणी म्हणून आणि कैकयी लाडकी राणी म्हणून खिरीचा प्रसाद देण्यात आला. ही वाटीतील खिरीचा प्रसाद खाणे आणि त्यानंतर पुत्रप्राप्ती होणे हा या यज्ञाचा मूळ उद्देश होता. राणी कौशल्या हि अतिशय प्रेमळ होती. तिने खिरीची वाटी तिला आणि कैकयी ला प्राप्त झाली आहे सुमित्रेला मात्र काहीच मिळाले नाही हे तिच्या लक्षात आले होते. सुमित्रा राणी बनल्यापासून ती पतीच्या सेवेच्या ऐवजी स्वतःसोबत राहते आहे, आपली सेवा करते आहे तिला देखील पुत्रप्राप्ती झालीच पाहिजे या उद्देशाने तिने तिच्या तिच्या खिरीच्या वाटीतील अर्धा हिस्सा सुमित्रेला दिला. कौशल्या व सुमित्रा याचं एकमेकिंवरच प्रेम पाहून कैकयी थोडीच मागे राहते. ती देखील दानशूर होती. दशरथ राजा फक्त आपल्या अधिपत्याखाली राहील एवढ मनात जरी असले तरी ती मनाने चांगली होती. तिने देखील तिच्या खिरीच्या वाटीतील अर्धा हिस्सा सुमित्रेला दिला. तिन्ही राण्यांनी खिरीचा प्रसाद - पुत्र कामेष्टी यज्ञाचा प्रसाद ग्रहण केला होता. राणी कौशल्या आणि राणी कैकयी यांच्या पेक्षा सुमित्रा हिच्या वाटेला खिरीचा हिस्सा अधिकचा आला होता. एकंदरीतच अयोध्या परिसर काही दिवसानंतर खूपच आनंदी झाला होता. तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. 

मोठी राणी कौशल्या हिला 'राम', कैकयीला 'भरत' आणि सुमित्रेला दोन अपत्ये 'लक्ष्मण' आणि 'शत्रुघ्न'. सुमित्रेला जे दोन पुत्र झाले होते ते जुळे होते. कौशल्या आणि कैकयीच्या या दोघींच्या खिरीच्या वाटीतील हिस्सा ग्रहण केल्याचा परिणाम असा तो समजही म्हणता येईल. 

पुत्रप्राप्ती नंतर सुमित्रा जेंव्हा आई होते तेंव्हा सर्वप्रथम मुलांना वाढविण्याची जवाबदारी आईवरच येते. सुमित्रेच्या गर्भातून एक नाही तर दोन अपत्ये जन्माला आलेली होती. मात्र ती चारही अपत्यांचा सांभाळ करायची. त्यांना खाऊ घालणे, खेळवणे हि जवाबदारी ती चोखपणे पार पाडायची. रामावर तिचे विशेष प्रेम होते. दशरथ राजानंतर अयोध्दा नगर सांभाळणे ती राजा परंपरा सांभाळणारा राम हा राजा होणार आहे हे सुमित्रेने हेरले होते. त्यामुळे ती त्याला अगदी लहानपणापासून आपल्या दोन्ही पुत्रांपेक्षा जास्त प्रेमाने सांभाळायची नाही. हे सर्व करताना तिला कोणत्याही प्रकारचा मोह नव्हता. 

सुमित्राला हे देखील माहिती होते कि तिला झालेली जुळी मुले हि केवळ आणि केवळ कौशल्या आणि कैकयी दोघींची उदारता होती, त्यामुळे तिने तिचा मुलांना म्हणजे लक्ष्मण हा रामाच्या सेवेसाठी तर शत्रुघ्न हा भरताच्या सेवेसाठी तयार केले. तिने त्या दोघांनाही तशीच शिकवण दिली.   

चारही मुले मोठी झाली. लग्नासाठी उपवर देखील झालेली. त्यांचे विवाह झाले. रामाची सीता, लक्ष्मणाची उर्मिला, शत्रुघ्नची श्रुतकीर्ती तर भरताची मांडवी सर्व सुना घरी आल्या. लग्न झाल्यावर जेंव्हा दशरथाला जेंव्हा रामाला राजा बनवायची वेळ आली तेंव्हा कैकयीच्या डोक्यात स्वत:चा मुलगा भरत याला पुत्र बनविण्याची इच्छा आली व तिने तिचे डावपेच वापरून ते करूनही दाखवले. रामाला वनवासाला जावे लागले. पत्नीधर्म म्हणून रामासोबत सीता देखील गेली. बंधुभाव लक्ष्मण देखील सोबत गेला. नुकतेच लग्न झालेली उर्मिला मात्र पुढचे १४ वर्ष अयोध्येला राजमहालातच राहिली. या ठिकाणी सुमित्रेला आपला पुत्र लक्ष्मण रामासोबत वनवासाला गेला याचे दु:ख पिता दशरथ - आणि माता कौशल्या यांच्याप्रमाणे होतेच. मात्र तिने कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्ष्मणाला अडविण्याचे काम केले नाही. उलट रामाच्या मागे खंबीरपणे एक ढाल म्हणून तिचा पुत्र लक्ष्मण जातो आहे यात तिला समाधान होते. सीतेने जेंव्हा रामासोबत वनवासाला जावे असा स्वतःचा निर्णय घेतला होता तेंव्हा सुमित्रेने कोणत्याही प्रकारे तशीच जवाबदारी सासू म्हणून उर्मिलेवर ढकलली नव्हती. 

रामासोबत लक्ष्मणाला चौदा वर्ष वनवासात जायचे होते त्या जाण्याचे निश्चितीकरण देखील सुमित्रेने घडवून आणले होते. काही केले तरी राजमहालात राहण्याचे सुख हे वनवासात भटकण्यापेक्षा कैक पटीने चांगले असते. कैकयी द्वारे घडवून आणलेला वनवास हा फक्त आणि फक्त रामासाठी होता. सीतेने तर आपला पतीधर्म म्हणून तो स्वीकारला होता. लक्ष्मणाचा वनवास हा त्याला सुमित्रेच्या शिकवणीतून प्राप्त झालेला होता.

धीरजु धरेउ कुअवसर जानी।
सहज सुहृद बोली मृदु बानी॥
तात तुम्हारि मातु बैदेही।
पिता रामु सब भाँति सनेही॥१॥

अवध तहाँ जहँ राम निवासू।
तहँइँ दिवसु जहँ भानु प्रकासू॥
जौं पै सीय रामु बन जाहीं।
अवध तुम्हार काजु कछु नाहीं॥२॥

सुमित्रा त्याला म्हणाली होता, "बाळा लक्ष्मणा, तू वनवासात जातोय, तेथे सीता हीच तुझी आई आहे, आणि तुझ्यावर प्रेम करणारा राम हाच तुझा पिता आहे. जसे सूर्याचा प्रकाश असेल तोच आपल्यासाठी दिवस असतो त्याचप्रमाणे तुझे वडीलबंधू राम जिथे तीच तुझी अयोध्या. तू जर वनवासात जात असशील तर या अयोद्धेत या महालात तुझे काहीच काम नाही. तुझ्या आयुष्यातील जी काही नाती आहेत ती फक्त आणि फक्त रामाशीच जोडलेली आहेत. जगातली मी इतकी श्रेष्ठ स्त्री आहे जिचा मुलगा रामाचा परमभक्त आहे. तू जर रामासोबत न जाता इथे राहण्याचा निर्णय घेतला असता तर मला आयुष्यभर खंत राहिली असती की मी निपुत्रिक राहिलेली बरी असते. पण तू रामासोबत जाण्याचा निर्णय घेतलास. हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. तू नेहमीच रामाची सेवा कर. बाळा, आसक्ती, क्रोधीपणा, मत्सर, अभिमान या सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवून तू मनापासून आपल्या कृती आणि वचनांनी सीता आणि रामाची सेवा कर तेच तुझ्या हिताचे आहे." सुमित्रेची हि शिकवण अत्भुत होती. तसे बघायला गेले तर राम तिचा सावत्र मुलगा. रामाच्या वनवासाच्या वेळी ती तिच्या मुलाला महालात ठेवून मोठा करू शकत होती. पण तिने तिच्या मुलासाठी संस्कारांची अशी तालीम तयार केली होती जी उल्लेखनीय अशी होती. तिच्या याच कृतीमुळे लक्ष्मण संपूर्ण महाभारतामध्ये एक महान योद्धा म्हणून रामाच्या नेहमीच बाजूला उभा असा दिसून येतो. रामाची एकट्याची पूजा होत नाही. लक्ष्मणाची देखील त्याच भक्तिभावाने लोक पूजा करतात. रामाला विष्णूचे रूप, सीतेला लक्ष्मीचे रूप तर लक्ष्मणाला शेष नागाचे रूप म्हणले गेले आहे. पण रामायणाच्या गोष्टीत मनुष्य रुपात असलेली सुमित्रा हि तिच्या मातृरुपात जी शिकवण लक्ष्मणाला देते आहे तीच संस्कार शिजोरी पुढील रामचरित्र मासात लक्ष्मण आपल्या कडे निष्ठेने बाळगताना दिसतो. 

सुमित्रा आणि दशरथाचे एक संभाषण देखील काहींनी ऐकले नसेल. सुमित्रेला अयोध्येमध्ये स्वतःचे देखील एक शयनकक्ष होते. ती बऱ्यापैकी कौशल्या मातेच्या कक्षेत असायची पण तिला जेंव्हा रडावेसे वाटायचे एकांत हवे असेल तेंव्हा ती तिच्या त्या ककक्षेत यायची. राम, सीता आणि लक्ष्मण जेंव्हा वनवासात गेले तेंव्हा संपूर्ण अयोद्धेवर डोंगर कोसळला होता. सुमित्रा तिच्या कक्षेत जाऊन आपल्या दोन्ही मुलांच्या विरहाने रडत होती. तिच्या त्या कक्षाच्या पुढेच राणी कैकयीचा कक्ष होता. राजा दशरथ हा कैकयी आवडीची असल्याने नेहमी तिच्याकडे जायचे. पण आज त्यांची पावले सुमित्रेकडे वळली होती. ते तिच्या खोलीत आले होते. सुमित्रा देखील रडत होती आणि दशरथाने देखील पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्या खोलीत प्रवेश केला होता. सुमित्रेने लगेचच त्यांना धरून पलंगावर बसवले. तिने लगेचच राजांचे पाणावलेले डोळे पुसले. राजा दशरथ हे कधीच तिच्या खोलीत येऊन तिच्याशी मनमोकळेपणाने बोलले नव्हते. सुमित्रेने त्यांना बोलले की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली यात धन्यता आहे. सुमित्रेला स्वतःचे व्यक्तिमत्व नक्की राजमहालात काय आहे याची चर्चा करण्याची मोठी संधी प्राप्त झालेली होती आणि ती संधी मात्र यावेळी तिने सोडली नाही. 

दशरथ म्हणाला, "महाराणी कौशल्या इतक्या मोठ्या मनाची आहे कि तिच्याविषयी नेहमीच माझ्या मनात सन्मान असतो.", "त्या तुम्हाला काही म्हणाल्या का?", सुमित्राने तत्काळ प्रश्न विचारला. "ती कोणत्याच गोष्टीला विरोध दर्शवत नाही", हीच तिची विशेषता आहे. खर तर रामाला राज गादीवर वसावयाचे नाही हा निर्णय राजाचा होता ते वचनबद्ध होते तेंव्हा कौशल्यां मोठी भूमिका घेऊ शकत होती, पण तिने घेतली नव्हती हि बाब दशरथाच्या मनात येऊन तिच्याविषयीचा स्नेह त्यांच्या मनात होता. सुमित्रेने लगेचच "राणी कैकयीच्या बद्दल तुमचे मत काय आहे?", हा प्रश्न दशरथासमोर मांडला. "ती मला अधिक प्रिय आहे, पण तिच्या उग्र स्वभावाची मला अत्यंत भीती वाटते.". दशरथाने तिने आजचे जे कृत्य केले होते त्यावर बोट ठेवून केलेले हे विधान होते. सुमित्राने लगेच पुढील प्रश्न विचारला, "माझ्या बद्दल तुमच्या मनात काही स्थान आहे कि नाहीच?" माझ्या मनातील प्रश्नांना कृपया करून उत्तरे दिल्याशिवाय तुम्ही येथून जावू नका अशी विनंती सुमित्रेने दशरथाला केली होती. पुत्र विरह यापेक्षा मोठे काहीच अजून जायचे बाकी नाही म्हणून दशरथ हे या बायकोची गर्जना ऐकायला समर्थ झालेले होते.        

सुमित्रेने दशरथाला जे ऐकवले होते ते कानउघडणी पेक्षा कमी नव्हते. "मी सुमित्रा अयोध्येची राणी आहे, हे फक्त म्हणायला, नाममात्र म्हणू शकतो. कौशल्या ताईच्या आधी मी तुमच्याशी लग्न केले होते. कौशल्याताईला जो आदर राणी म्हणून मिळाला त्याचा एक अंशही मला आत्तापर्यंत मिळाला नाही. मी हे मान्हेय करते कौशल्याताईचे लग्न तुमच्याशी आपल्या लग्नाच्या आधीच निश्चित झाले होते, म्हणून मला त्याच्याकडून जास्त आदराची अपेक्षा नाही. राम हा ज्येष्ठ पुत्र असल्याने गादीचा नैसर्गिकत: राजगादी सांभाळायला वारसदार तोच आहे, त्यामुळे कौशल्याताईला  राजमातेचे पद मिळाले असते तर मला खूप आनंद झाला असता. पण माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कैकेयीशी तुमचे लग्न झाल्यावर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रेम आणि आदर तिला दिले. तुम्ही तिचे सौंदर्य, शौर्य आणि रथ चालवण्याची विशेष क्षमता यामुळे आम्हा दोघी बहिणींपेक्षा कैकेयीवर जास्त प्रेम केले. कौशल्याताईला तुमचा मान मिळाला आणि कैकेयीला तुमचे प्रेम मिळाले पण मला काय मिळाले? 

"मी राणी असूनही कोठेच नाही." 

दशरथाने तिची समजूत काढताना म्हणले, "नाही नाही, सुमित्रा असे अजिबातच नाही. माझे तुझ्यावर देखील प्रेम आहे. 

सुमित्रेने जेंव्हा पुढील गोष्ट दशरथाच्या समोर मांडली तेंव्हा मात्र त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. त्या म्हणाल्या, "तुम्ही जेंव्हा माझ्या जवळ यायचे, तेव्हा तुम्ही माझे म्हणून कधीच माझ्या जवळ नव्हता, मला याचा पुरेपूर अनुभव आहे. माझे  असे मी कोणाला म्हणायचे? मला दोन मुलगे होते लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तेही माझ्यासोबत नाहीत. लक्ष्मणाने रामाची सेवा करण्याचे व्रत घेतले आणि शत्रुघ्न भरताची सावली बनले. आता तुम्ही म्हणाल की मी दोन्ही पुत्रांना त्यांच्या मोठ्या भावांची सेवा करण्याचा आदेश दिला होता. हे खरं आहे. पण तो आदेश सुमित्रा म्हणून नव्हता तो अयोध्येच्या राणीचा होता. आणि अयोध्येची राणी असण्याव्यतिरिक्त मी एक पत्नी आणि आई देखील आहे. बोला, माझ्याकडे काय आहे? माझे दोन्ही हात रिकामे आहेत. ना मला माझ्या पतीचे पूर्ण प्रेम मिळाले, ना मला माझ्या मुलांवर प्रेम करण्याचे भाग्य लाभले. महाराज उत्तर द्या, आज माझ्याकडे काय आहे?" 

रामाला वनवासात पाठवून राम, कौशल्या यांचा गुन्हेगार समजत असलेल्या दशरथाला आज तो सुमित्रेला राणी असूनही लक्षात न घेतल्यामुळे तिच्यावर आजवर काय परिस्थिती ओढवली आहे, व त्या परिस्थितीचा जवाबदार मी स्वत:च हे लक्षात आले होते.  

राम जेंव्हा वनवासात जातो तेंव्हा माता कौशल्या यांची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली असते. त्यांना सांभाळण्याचे उभारी देण्याचे काम देखील पुढे सुमित्रा चोख पार पाडताना दिसते. 

युद्धभूमीवर जेंव्हा लक्ष्मणाला जेंव्हा शत्रू कडून शक्ती लागून तो मूर्च्छित पडतो अशी बातमी जेंव्हा सुमित्रेच्या कानावर येते तेंव्हा ती कोणत्याही परिस्थितीमध्ये गांगरून न जाता प्रसन्नतेने म्हणते की, "लक्ष्मणासारख्या मुलाला माझ्या पोटात वाढवून आज मी खरेच धन्य झाले आहे. रामाच्या सेवेत त्याने तो मूर्च्छित झाला आहे पण त्याने रामाला काहीच होऊन दिले नाही, त्याने माझा पुत्र होऊन मला सार्थकी लावले आहे." 

एकंदरीत जेंव्हा सुमित्रेच्या जीवनात डोकावून पाहिले तर एक त्यागमूर्ती म्हणून समोर येते. ती काशी नरेशाची लेक आणि दशरथाची राणी असूनही तिच्या जीवनात तिचे असे काहीच नव्हते. तीने नेहमीच तिच्या आजूबाजूच्या लोकांवर येथेच्छ प्रेम करूनही तिच्या जीवनात तिला हवे तसे प्रेम मिळाले नाही. तीने त्या प्रेमाची कधी अपेक्षाही केली नाही. मात्र तिच्या या त्यागाची आठवण सर्वांनी ठेवावी म्हणून हा लेख. 

डॉ. अलोक पवार.

Comments

Popular posts from this blog

अश्वपती